आयपीएल 2023 चा मिनी लिलाव या महिन्यात 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या लिलावासंदर्भात अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोची येथे होणार्या या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लावली जाईल. मात्र यामधून केवळ 87 खेळाडू निवडले जातील, 30 परदेशी खेळाडूंसाठी स्लॉट उपलब्ध आहे. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी शिल्लक आहेत, तर केकेआरकडे सर्वात कमी 7.05 कोटी आहेत.
991 खेळाडूंमधून 369 खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली होती, परंतु फ्रँचायझींच्या आदेशानुसार या अंतिम यादीत आणखी 36 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आयपीएल 2023 च्या अंतिम यादीत एकूण 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या 405 खेळाडूंमध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 132 परदेशी खेळाडूंपैकी 4 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. अंतिम यादीमध्ये 119 कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे, तर 282 अनकॅप्ड आणि चार असोसिएट नेशनचे खेळाडू आहेत.
19 परदेशी खेळाडूंनी सर्वाधिक बोली ठेवली आहे जी 2 कोटी रुपये असेल. याशिवाय 1 कोटींच्या ब्रॅकेटमध्ये 11 खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. भारतीय संघाचे युवा खेळाडू मयंक अग्रवाल आणि मनीष पांडे यांचा आणखी 20 खेळाडूंसह 1 कोटींच्या यादीत समावेश आहे. आयपीएलचा हा लिलाव दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. गेल्या वेळी मेगा लिलाव दोन दिवस चालला होता पण यावेळी मिनी लिलाव फक्त एक दिवस होणार आहे. यावेळी बेन स्टोक्स, सॅम करण आणि कॅमेरॉन ग्रीन यांसारख्या खेळाडूंवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या समावेशामुळे लिलाव खूपच रंजक होणार आहे.
यादीत या बड्या खेळाडूंचीही नावे
अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, जो रूट, केन विल्यमसन, शकीब अल हसन, बेन स्टोक्स, इशांत शर्मा, सॅम करण, लिटन दास, जेसन होल्डर यांसारख्या बड्या खेळाडूंचे नाव या खेळाडूंच्या यादीत आहे. गेल्या मोसमापर्यंत विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादचे तर मयंक अग्रवालने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. दोघांनाही त्यांच्या फ्रेंचायझीने रिलीज केले आहे.