Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगरस्ते ओस, दुकाने बंद, वरळीत कडकडीत बंदला सुरुवात; महापुरुषांच्या अवमानाविरोधात बंदची हाक

रस्ते ओस, दुकाने बंद, वरळीत कडकडीत बंदला सुरुवात; महापुरुषांच्या अवमानाविरोधात बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापर्यंतच्या महापुरुषांचा वारंवार अवमान सुरू आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अवमान करण्यात येत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. विविध संघटना आणि छोट्या पक्षांनी मिळून ही बंदची हाक दिली असून सकाळपासूनच वरळीत कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे. वरळीतील दुकाने बंद असून रस्तेही ओस पडले आहेत. त्याशिवाय कोणतीही अनुचित घटना घडू नये वा बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून वरळीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुण्यानंतर वरळीत बंद पुकारला जात आहे. मुंबईतील हा पहिलाच बंद आहे. शिवाय माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ असल्याने या बंदला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, पहाटे 6 वाजल्यापासूनच वरळीत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासूनच वरळीतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू असल्याने रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.

बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीत जागोजागी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद पुकारला जाणार आहे.

वरळीत शांततेत बंद सुरू आहे. या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. दुपारनंतर बंद अधिकच कडकडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे राज्यात त्याचे हिंसक पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळण्यात आले होते. तसेच राज्यपाल हटावची मागणीही करण्यात आली होती.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची छत्रपती शिवाजी महाराज याच्या गनिमीकाव्याशी तुलना करून वाद ओढवून घेतला होता. त्यामुळे अधिकच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यानंतर भाजपचे आणखी एक नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं सांगून नवा वाद ओढवून घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वरळीत बंद पुकारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -