दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे, अशी मागणी केली होती.
त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिशा सालियन प्रकरणी भाष्य केलं होतं. दिशा सालियन प्रकरण झाले त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. हे प्रकरण सीबीआयकडे गेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही. असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल अजित पवार यांनी केला होता.
केंद्रसरकारच्या हातात सीबीआय आहे. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगत अजित पवार यांनी त्याचा तीव्र निषेध नोंदवला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला.