Thursday, November 21, 2024
Homeकोल्हापूरसंशयिताने वास्तुशांतीच्या कार्यक्रमात वरदचे केले होतं अपहरण

संशयिताने वास्तुशांतीच्या कार्यक्रमात वरदचे केले होतं अपहरण


सावर्डे बुद्रुक येथे झालेल्या बालकाच्या खून प्रकरणातील संशयित दत्तात्रय तुकाराम वैद्य याने वास्तुशांतीच्या कार्यक्रातून या बालकाचे अपहरण केले, त्यानंतर शोधकार्यतही तो सहभागी होता अशी माहिती पुढे आली आहे.


संशयित वैद्य याला लग्नाच्या १५ वर्षांनंतरही मूल बाळ नसल्याने त्याने अपत्य प्राप्तीसाठी अपहरण करून वरदचा खून केला, अशी चर्चा घटनास्थळी आहे, पण पोलिसांनी अधिकृतरित्या खुनाचे कारण स्पष्ट केलेले नाही.


वैद्य हा वरदचे वडील डॉ. रवींद्र पाटील यांचा मित्र आहे. पाटील यांचे गाव सोनाळी आहे. वरदचे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे हे सावर्डे बुद्रुक येथील आहेत. त्यांनी नवीन घर बांधले आहे. या घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम १७ ऑगस्टला होता. त्यासाठी पाटील दांपत्य त्यांचा मुलगा वरद याला घेऊन कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रातूनच वरद बेपत्ता झाला.


वास्तुशांतीसाठी संशयित वैद्य यालाही आमंत्रित केलेलं होतं. त्याने या कार्यक्रमातूनच वरदचे अपहरण केले.
शुक्रवारी सकाळी सावर्डे बुद्रुक गावच्या लक्ष्मीनगर शेजारील शेतवडीत वरदचा मृतदेह मिळाला. यापूर्वी पोलिसांसह वरदचे नातेवाईकही शोध मोहीम राबवत होते. या शोधकामात संशयित सहभागी झाला होता.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


दोन तास पोलिसांची वाहने रोखली
मृतदेहा पोस्टमार्टेमसाठी नेला जात असताना नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलिसांची वाहने थांबवली. संशियाताला आमच्या समोर हजर केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.


उप विभागीय पोलीस उप अधीक्षक आर.आर.पाटील व मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करु असे आश्वासन दिल्यानंतर समुदाय शांत झाला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली.


अधिक तपास मुरगूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे,पोलिस उपनिरीक्षक के.डी. ढेरे,बीट अंमलदार सतीश वर्णे,पोलिस नाईक स्वप्नील मोरे,संदीप ढेकळे, राम पाडळकर करत आहेत.


हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
अपहरण झालेल्या मुलाचा खून झाल्याचे समजताच मुलाचे नातेवाइक व सोनाळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे ह्नदय पिळवटून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -