मिरज तालुक्यातील कवठेपिरान मध्ये काही दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली असतानाच आता भर दिवसा घरात घुसून टेबलावर ठेवलेले ४२ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सदर चोरीची घटना हि मंगळवार दि. ३० मे रोजी सकाळी साडेआठ ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुखदेव शिवाजी माळी (वय ३३ रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुखदेव माळी हे आपल्या कुटुंबियांसह कवठेपिरान गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर राहतात. मंगळवार दि. ३० मे रोजी सकाळी साडेआठ ते ११ वाजण्याच्या सुमारास सुखदेव माळी यांच्या आई शालन माळी या किचन मध्ये काम करत होत्या. Chori
यावेळी अज्ञात चोरटयांनी घराच्या हॉल मध्ये कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून हॉल मधील टीपॉयवर ठेवलेले ४२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास करत पोबारा केला. किचन मधील काम आटोपल्यानंतर शालन माळी या दागिने घेण्यासाठी हॉल मध्ये आल्या असता त्यांना तिथे दागिने सापडले नाहीत. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र दागिने काही मिळाले नाहीत. अखेर घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर सुखदेव माळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कवठेपिरान गावामध्ये काही दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली असतानाच पुन्हा घरात घुसून चोरी झाल्याने खळबळ उडाली होती.Chori