साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक होण्यासाठी राजकीय नेत्यांचा एकीकडे आटापिटा सुरू असताना भोगावती साखर कारखान्यांच्या निवडणुकीत (Bhogavati Sugar Factory Election) विद्यमान अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी उमेदवारी अर्जच न भरता वेगळा आदर्श आज घालून दिला
.कारखान्याच्या सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व करणार पण स्वतः रिंगणात राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी या निर्णयानंतर दिली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असताना रिंगणाबाहेर राहिलेले श्री. पाटील हे अलिकडच्या काळातील राज्यातील एकमेव उदाहरण म्हणावे लागेल.‘भोगावती’ साठी ३० जुलै रोजी मतदान होत आहे तर काल या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. यापूर्वीच पी. एन. यांनी आपण पुढची ‘भोगावती’ ची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते, पण प्रत्यक्ष निवडणूक लागल्यावर त्यांची भुमिका काय असेल याविषयी उत्सुकता होती.
काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज दाखल न करता सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व करण्याबरोबरच आपल्या जागी सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. श्री. पाटील हे गेली सहा वर्षे ‘भोगावती’ चे अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.पण, संचालकांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. १९८९ पासून श्री. पाटील कारखान्याचे नेतृत्व करतात, अपवाद मध्यंतरीच्या पाच वर्षांचा आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत कारखान्यात सत्तांतर घडवले होते. कारखान्याच्या बिघडलेल्या अर्थकारणासह अनेक आव्हाने समोर असल्याने संचालक व कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. तेव्हापासून तेच कारखान्याचे अध्यक्ष होते. काल व आज सकाळपासून त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा म्हणून कार्यकर्ते आग्रही होते.
त्यासाठी त्यांच्या निवासस्थानासह गॅरेजवर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. पण शेवटपर्यंत श्री. पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहीले.‘कर्ज काढल्याशिवाय कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे देता येत नव्हते अशी परिस्थिती आम्ही कारखाना ताब्यात घेतल्यावर होती. आता अशी परिस्थिती नाही, कारखाना चांगला चालवला याचा अभिमान आहे. यापूर्वीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार अर्ज भरला नाही. सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व करणार आणि माझ्या जागी सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी देणार. बिनविरोधचा प्रस्ताव आला तर चांगलाच त्यासाठीही प्रयत्न करू