विरळे (ता. शाहूवाडी) येथील शंकर पांडुरंग कांबळे (वय 64) यांचा शनिवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या दरम्यान शेताकडून घरी परत येत असताना थोरल्या ओढ्याच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याच्या भीतीमुळे त्याचदरम्यान हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.रविवारी रोप लावण करण्याचे शंकर कांबळे यांचे नियोजन होते.
त्यासाठीच ते शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान शेतात पाणी लावण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. घरी परत येत असताना ओढ्यातील पाणी अचानक वाढले. ओढा ओलांडत असताना नेमका त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा तीव- धक्का बसला आणि ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत खाली गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून घरच्यांसह आजूबाजूच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली. रात्री बाराच्यादरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शंकर कांबळे हे पोस्टमन म्हणून कार्यरत होते. पुढच्या दोन ते तीन महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते. ते स्वभावाने अत्यंत मनमिळावू असल्याने गावातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचे सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.