Tuesday, November 25, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : वैरणीला गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला

कोल्हापूर : वैरणीला गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला

पन्हाळा तालुक्यातील वैरणीला गेलेल्या तरुणावर गव्याने हल्ला केल्याची घटना घडली. बाजारभोगाव पैकी काऊरवाडी येथील तरूण जखमी झाला आहे. गव्याने त्यांच्या पृष्ठभागावर शिंग खूपसले असून त्यांच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.उत्तम इंगळे हे आज (दि. १५) शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नामदेव गोरूले व तानाजी खोत यांच्यासोबत नेहमी प्रमाणे शेतात वैरणीसाठी गेले होते. वसंत खोत यांच्या कुरव नावाच्या शेतात ऊसाचा पाला काढत असताना शेतात दबा धरून बसलेल्या गव्यांने पाठीमागून येवून इंगळे यांना शिंगाने उचलून फेकले. यात त्याच्या उजव्या बाजूस मागील पृष्ठभागात शिंग घुसवल्याने ते गंभीर जखमी झाले. हा गवा पुन्हा चाल करून आल्यावर जखमी अवस्थेत त्यांनी ऊसाच्या फडातून पळत बाहेर येवून जीव वाचवला.या फडात गव्यांचा कळप होता. कळपातील दुसऱ्या एका गव्यांने नामदेव गोरूले यांच्यावर चाल केली. मात्र सुदैवाने त्यांचाही जीव वाचला.

ग्रामस्थांना ही माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमी उत्तम इंगळे यांना माजी सरपंच बाबासाहेब खोत, आनंदा इंगळे, प्रशांत इंगळे, दत्ता इंगळे, संदीप इंगळे यांनी बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील प्राथमिक उपचारानंतर सीपीआर रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते व वनपाल नाथा पाटील यानी जखमी शेतकऱ्याची भेट घेवून विचारपूस केली. दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी गव्यांना शेतातून जंगलक्षेत्रात हाकलूनलावले. महिनाभरात गव्याच्या हल्ल्याची काऊरवाडीतील ही दुसरी घटना घडल्याने शेतकरी भितीच्या छायेखाली आहेत. आम्ही शेतात जायचं की नाही . असा सवाल विचारला जावू लागला असून गव्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -