कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने कोयना, धोम, चांदोली धरणांतून पाणी सोडले आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. या धरणात 25.67 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी 905 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. याबरोबरच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1050 क्युसेक विसर्ग सोडला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.