मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून देशासह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसत आहे.
त्यामुळे नागरिकांना कधी उकाडा, कधी थंडी तर कधी पावसाचा सामना करावा लागत आहे. बुधवारी कोकणातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
ऐन खरीप हंगामातील पिके काढणीला असताना अवकाळी पावसाचं संकट ओढवल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीकांची काळजी, घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण (WeatherUpdates) निर्माण झालं आहे.
त्याचबरोबर केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच केरळ किनारपट्टीपासून दक्षिण अरबी समुद्रात खालच्या भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी पुढील सहा ते सात दिवस राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
बुधवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाने अचानक हजेरी लावली. आता येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.