प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (LPG Gas Subsidy) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे.
येत्या काही दिवसांत तुम्हाला आता एलपीजी गॅस सिलेंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) आणखी सूट मिळू शकते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 एलपीजी गॅस सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यांत उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, या वृत्ताबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ईमेलद्वारे माहिती मागवण्यात असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढलेल्या असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 ऑक्टोबर रोजी 9.5 कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपये अनुदान मंजूर केले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सरकारने देशभरातील सर्व सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 603 रुपये मोजतात, तर इतर सरासरी ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडर 903 रुपये द्यावे लागतात.
गरीब कुटुंबातील गृहिणींनी चूलीवर जेवण बनवणं टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने अलीकडेच 2024-26 या वर्षासाठी 7.5 कोटी रुपये आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनसाठी अतिरिक्त 1650 कोटी रुपये जारी केले आहेत.
अलिकडे सरकारने दरात वाढ केल्याने एलपीजी गॅल सिलेंडरच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केले होते. केंद्र सरकारच्या या दिलासादायक निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सरासरी संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी आणखी 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये एलपीजी गॅसची मागणी वाढली असल्याचे दिसून आली आहे. एलपीजी सिलेंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.