Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंग१० हजार शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची संधी! आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरु; ६...

१० हजार शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची संधी! आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरु; ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवरील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा आता सुरू झाला आहे. २०२२ मध्ये केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.आंतरजिल्हा बदलीसंदर्भात ग्रामविकास विभागाने गुरुवारी (ता. ३०) आदेश काढले आहेत. शिक्षक सहकार संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्याचा लाभ राज्यातील अंदाजे दहा हजार शिक्षकांना होणार आहे. दरम्यान, संघटनेने ‘सकाळ’चे विशेष आभार मानले आहेत.

 

आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र इच्छुक शिक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने असा शासन आदेश ३ नोव्हेंबर रोजी काढला होता. या आदेशाला खो देत ग्रामविकास विभागाने २२ नोव्हेंबर रोजी पत्र काढत फक्त २०२२ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांनाच संधी दिली जाईल, असे नमूद केले होते. सर्व पात्र शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीच्या सहाव्या टप्प्यात संधी मिळावी यासाठी शिक्षक सहकार संघटनेने सतत पाठपुरावा केला. अनेक शिक्षकांनी स्वजिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्याने अर्ज केले नव्हते किंवा उपलब्ध जागेनुसार इतर जिल्ह्यांचे पर्याय दिले होते.

 

नव्याने अर्ज करण्याची किंवा निर्णय बदलण्याची संधी अर्ज न केलेल्यांनाही द्यावी आणि ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना अर्जात बदल करण्याची संधी मिळावी अशा प्रमुख मागण्या शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व नीलेश देशमुख यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत केल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांनी ते आश्वासन पाळत नवीन आदेश काढले.आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबविताना २०२२ मध्ये अर्ज केलेल्यांना अर्जात बदल करण्याची संधी मिळणार असून अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करता येतील, असे ग्रामविकास विभागाने गुरुवारी (ता. ३०) काढलेल्या आदेशात म्हंटले आहे. ही मागणी पूर्ण व्हावी म्हणून शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रविंद्र अंबुले, मनोज बनकर, राजेश भिसे, शशिकांत चाफेकर, सतिश चव्हाण यांनीही मेहनत घेतली. ‘सकाळ’नेही त्यांना वेळोवेळी साथ दिली.

 

ग्रामविकास विभागाचे काय आहे आदेश….

 

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक ३० जून, २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांना अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.

 

२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना त्यांच्या अर्जात जिल्हा बदलण्यास ‘एडीट’ची संधी देण्यात यावी.

 

न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेशदिलेले असतील, त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन किंवा विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

 

बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत देण्यात येत आहे. त्यानंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -