इचलकरंजी :
दोन दशकापासून आदिवासी फासेपारधी समाजाच्या घरकुल संदर्भातील सुरु असलेल्या पाठपुराव्याला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने यश आले आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत इचलकरंजीत 175 घरकुल उभारणी संदर्भातील अध्यादेश राज्य शासनाने नुकताच जारी केला आहे. याबद्दल आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कॉ. मलाबादे चौकात फटाक्यांची आतषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
इचलकरंजी शहरातील वॉर्ड नं. 20 व 21 मध्ये स्वामी मळा, लिगाडे मळा, कोले मळा, जवाहरनगर, साईनाथनगर, सोडगे मळा परिसरात आदिवासी फासेपारधी समाजाची वस्ती आहे. अनेक वर्षापासून फासेपारधी कुटुंबे वास्तव्यास आहेत. या फासेपारधी समाजाला त्यांच्या स्वप्नातील घरकुल देण्यासंदर्भात राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. परंतु घरकुलासाठीचा प्रस्तावावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न प्रदीर्घकाळापासून रखडलेला होता. या घरकुल प्रश्नी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
तसेच आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांनीही सातत्याने विविध आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नी आवाज उठविला होता. या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्य शासनाने 175 घरकुल उभारणीस मंजूरी दिली आहे. त्याचा आनंदोत्सव आदिवासी फासेपारधी समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला.
नगरपालिका असताना घरकुलांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु तो पाठविण्यापूर्वी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 72 घरकुलांचा प्रस्ताव 4 कोटी 60 लाख 34 हजार 755 रुपये इतका आहे. तर 84 घरकुलांचा प्रस्ताव आर्किटेक्ट इंजिनिअर राजीव हुल्ले यांनी तयार करुन तो महानगरपालिकेला सादर केलेला असून तो प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसह आदिवासी विभागाकडे तातडीने पाठविण्यात यावा असे सांगत मोहन काळे यांनी, घरकुलासाठी लागणारा निधी आमदार प्रकाश आवाडे शासनाकडून निश्चितपणे मिळवून देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी ताराराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, मोहन काळे, गणेश काळे, सुभाष चव्हाण, विलास चव्हाण, जीवा चव्हाण, वसंत काळे, महादेव चव्हाण, गोपाळ काळे, प्रकाश काळे, जानु काळे, सोमनाथ काळे, गोपाळ चव्हाण, सुनिल चव्हाण व समाजबांधव उपस्थित होते.