भारतीयांसाठी अभिमानाचा असणारा क्षण आता जवळ येतो आहे. मिशन गगनयान लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या यानात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावं समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी या अंतराळवीरांची नावं जाहीर केली आहेत. केरळच्या तिरुअनंतपुरममधल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी या चार अंतराळवीरांचा देशाला परिचय करून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या अंतराळवीरांना ॲस्ट्रॉनॉट्स विंग्स घातले. या चार अंतराळवीरांविषयी माहिती जाणून घेऊयात…
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर
‘गगनयान’च्या 4 अंतराळवीरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे केरळचे आहेत. थिरुथियद या ठिकाणी 26 ऑगस्ट 1976 साली त्यांचा जन्म झाला. प्रशांत बालकृष्णन नायर हे एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. 1998 साली ते वायूदलात रुजू झाले. ‘सोर्ड ऑफ ऑनर’चे ते मानकरी आहेत. कॅट ए फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ते राहिलेत. 3 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, हॉक डॉर्निअर आणि एएन-32सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन हे मुळचे तमिळनाडूचे आहेत. 1982 साली त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. एनडीएचे ते माजी विद्यार्थी आहेत. राष्ट्रपती सुवर्णपदक आणि ‘सोर्ड ऑफ ऑनर’चे ते मानकरी आहेत. जून 2003मध्ये ते भारतीय वायूदलात रुजू झाले. 2 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सुखोई 30 एमकेआय, मिग -21, मिग-29, जॅग्वार, डॉर्निअर आणि एएन-32 सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव अजित कृष्णन यांच्या यांच्याकडे आहे.
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे उत्तर प्रदेशमधले आहेत. 17 जुलै 1982 ला त्यांचा जन्म प्रयागराज या ठिकाणी झाला. अंगद प्रताप हेदेखील एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 2004 मध्ये भारतीय वायुदलात ते रुजू झाले. 2 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सुखोई 30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-32 सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.
विंग कमांडर शुभांशू शुक्ला
विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे उत्तर प्रदेशमधले आहेत. 10 ऑक्टोबर 1985 ला लखनऊ त्यांचा जन्म झाला. एनडीएचे ते माजी विद्यार्थी आहेत. जून 2006 मध्ये भारतीय वायुदलात रुजू झाले. 2 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. सुखोई ३० एमकेआय, मिग-21, मिग-29, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-32 यांचा अनुभव आहे.मिशन गगनयान
गगनयान मिशन हे भारताचं पहिलं ह्युमन स्पेस फ्लाईट आहे. 2025 मध्ये हे लॉन्च केलं जाईल. या मिशन अंतर्गत चार अंतराळवीरांना 400 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये पाठवलं जाईल. या अंतराळवीरांचं 2020 ते 2021 या काळात ट्रेनिंग झालं आहे. दोन ते तीन दिवस हे अंतराळवीर तिथे संशोधन करतील. त्यानंतर हिंदी महासागरात त्यांना उतरवलं जाईल.