आयपीएलच्या मागच्या पर्वात गुजरात टायटन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदाची माळ गळ्यात घातली होती. यंदा त्याच जोशात चेन्नई सुपर किंग्सचा संघ मैदानात उतरला आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा धोनीऐवजी ऋतुराजच्या गळ्यात आहे. या स्पर्धेत ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने चांगली सुरुवात केली.
सलग दोन सामन्यात विजय मिळवला आणि प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर राहिले. मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाची गाडी रुळावरून उतरली आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर सनरायझर्स हैदराबादनेही चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. असं असतान हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील पराभवाचं खापर ऋतुराज गायकवाडने खेळपट्टीवर फोडलं आहे.
ऋतुराज गायकवाडने सांगितलं की, “खेळपट्टी खूप धीमी होती. चेन्नईच्या डावावेळी ही खेळपट्टी आणखी धीमी होत गेली.”ऋतुराज गायकवाडने सांगितलं की, “खरं सांगायचं तर ही खेळपट्टी खूपच धीमी होती. त्यांनी बॅक-एंडमध्ये चांगली गोलंदाजी केली. सामना नियंत्रणात ठेवला आणि आम्हाला फायदा उचलू दिला नाही. मला वाटतं आम्ही सुरुवातीला चांगले प्रदर्शन केलं. पण त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलं. काळ्या मातीची खेळपट्टी आहे. खेळपट्टी धीमी होईल याचा अंदाज होता. पण वेळेनुसार ही खेळपट्टी आणखी धीमी होत गेली. त्यांनी बाउंड्रीचा चांगल्याप्रकारे वापर केला.”
“आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप साऱ्या धावा दिल्या. एक झेल सोडला आणि महागडं षटक..तरीही सामना 19 व्या षटकापर्यंत खेचणं मोठी बाब आहे. मला वाटतं की 170-175 धावा झाल्या असत्या तर बरं झालं असतं. शेवटी थोडं दवंही पडलं. असं असूनही मोइनने चांगली गोलंदाजी केली. 15-16 व्या षटकात चेंडू फिरवला. सामन्यात खेळपट्टीत फारसा काही बदल झाला, असं वाटत नाही.”, असंही ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला.चेन्नई सुपर किंग्सने चार पैकी दोन सामने गमावले आहेत. असं असलं तरी गुणतालिकेतील तिसऱ्या स्थानी आहेत. तर सनरायझर्से हैदराबादने पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. त्यामुळे आघाडीला असलेले पराभूत झाल्याने गुणतालिकेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.