उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. कधी महत्वाच्या घोषणा तर कधी एखादा इनोव्हेटिव्ह व्हिडीओ, कल्पना ते त्यांच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. आता त्यांनी आणखी एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला असून, त्यासोबत लिहीलेल्या कमेंटमुळे लोकांचं मन जिंकलंय. सोशल मीडियावर पुन्हा एकदा जबाबदारीबद्दलचा हा व्हिडीओ शेअर झाला असून ते पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तरंच नवल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे लोकंही इमोशनल झाले असून त्यामध्ये अवघ्या 10 वर्षांच्या एका मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. वडिलांच्या पश्चात त्याने त्याच्या चिमुकल्या खांद्यावर घराची जबाबदारी घेतली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अवघ्या 10 वर्षांचा एक मुलगा रस्त्याच्या कडेला एक गाडी लावून रोल्स विकताना दिसतोय. बघता बघता हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आणि तो उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला. त्या मुलाची कहाणी ऐकून आनंद महिंद्रा हे स्वत: मदतीसाठी पुढे सरसावले. त्या मुलाच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. त्याचा आणि बहिणीचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो मुलगा स्वत: मेहनत करतो आणि रोल्सची ही गाडी चालवतो. या मुलाचा हा व्हिडीओ आधीही व्हायरल झाला होता.
2 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्या मुलाने सांगितले की, पूर्वी त्याचे वडील रोल विकायचे, पण त्याच्या मृत्यूनंतर आता तो हे काम करतो. आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली आहे. त्याची आी आता त्यांच्यासोबत रहात नाही, ती माहेरी निघून गेल्याचेही त्या मुलाने सांगितलं. तो आणि बहीण त्याच्या काकांसोबत राहतात आणि तो रोल्स विकून पैस कमावतो. मात्र असं असंल तरी त्याने त्याचं शिक्षण अद्यापही सोडलं नसून, काम करता करता तो शिक्षणही पूर्ण करतोय. एवढ्या लहान वयात एवढी मेहनत करण्याची हिम्मत कुठून आली? असा सवाल त्याला एकाने विचारला. त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘मी गुरु गोविंद सिंह यांचा मुलगा आहे. माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी लढेन, असे सांगत त्या मुलाने शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी या मुलाची माहिती देखील मागितली आहे. ‘हिमतीचे दुसरं नाव म्हणजे जसप्रीत..’ पण त्याच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही पाहिजे. जर कोणाकडे याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर प्लीज शेअर करा. शिक्षणासाठी त्याला सपोर्ट कसा करता येईल याचा उपाय महिंद्रा फाऊंडेशनची टीम शोधून काढेल, असे सांगत त्यांनी त्या चिमुकल्या मुलाला मदत करण्याची घोषणा केली. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्या मुलाच्या हिमतीला दाद देत त्याचं कौतुक केलं.