इचलकरंजी
वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला.
प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभरर्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून मनोभावे पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला.
सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील, शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लाकूड ओढणे शर्यतीत लहान गटात गणेश साळुंखे (प्रथम), बिलाल पटवेगार (द्वितीय), चंद्रकांत सातपुते (तृतीय) तर मोठ्या गटात यश बेलेकर (प्रथम), दीपक पाटील (द्वितीय) व चंद्रकांत बंडगर (तृतीय) यांच्या बैलांनी यश मिळविले. सुट्टा बैल पळविणे स्पर्धेमध्ये बादल ग्रुप च्या बैलाने प्रथम, हरीष खरात यांच्या बैलाने द्वितीय तर उमेश कोळेकर यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला.
याप्रसंगी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाबासाहेब पाटील, गजानन लोंढे, आर. के. पाटील, राहुल घाट, किशोर पाटील, नरसिंह पारीक, महावीर जैन, शेखर शहा, सतीश मुळीक, नितेश पोवार, बाबू रुग्गे, काशिनाथ गोलगंडे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, संजय केंगार आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांतापा मगदूम, सागर मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरीबे, बजरंग कुंभार, सागर गळदगे, इरफान आत्तार, सागर कम्मे आदींसह गावकामगार पाटील, पोलिस पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.