महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या गव्हर्निंग कौन्सिल संचालक पदी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे.
राजकारण, समाजकारण आणि उद्योग अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. राहुल आवाडे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या मुंबई येथील बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा केली. रेंदाळ जिल्हा परिषद सदस्य असलेले डॉ. राहुल आवाडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास घडविला. तर कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना केन कमिटी चेअरमन पदावर ते कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना आखत ऊस उत्पादन वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. सध्या ड्रोनद्वारे औषध फवारणीचा प्रयोग केला जात आहे.
डॉ. राहुल आवाडे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिल संचालकपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी व सर्व संचालकांच्या उपस्थितीत या निवडीबद्दल डॉ. आवाडे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.