इचलकरंजी-
राज्यातील वस्त्रोद्योगातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात सोमवारी मुंबई येथे अभ्यास समितीची बैठक वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये सर्वच विषयावर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. हे निर्णय लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समिती सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समिती नेमण्यात आली आहे. या समितीने सर्व बाबींचा विचार करून उपाययोजना संदर्भात अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्या विषयावर नामदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.
यामध्ये मल्टीपार्टी कनेक्शन, वीज सवलत, व्याज सवलत, वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करणे यासह प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
बैठकीस अभ्यास समितीचे अध्यक्ष नामदार दादा भुसे, आमदार प्रकाश आवाडे, रईस शेख, सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग उपसचिव श्रीकृष्ण पवार, महावितरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.