Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीशेळके मळा येथील आरक्षणावर नागरिकांची हरकती

शेळके मळा येथील आरक्षणावर नागरिकांची हरकती

इचलकरंजी –

महानगरपालिकेच्या वतीने नव्या प्रारुप विकास आराखड्यात रेड झोनमध्ये समाविष्ट आणि दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या रि.स.नं. 427 याठिकाणी टाकलेले भाजी मार्केटचे आरक्षण वगळण्यात यावे, अशी मागणी शेळके मळा परिसरातील नागरिकांनी हरकती व सूचनांवर आपले म्हणणे मांडताना केली. त्याचबरोबर या संदर्भातील निवेदन उपायुक्त प्रसाद काटकर यांनाही देण्यात आले.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिध्द केला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकतीवरील सुनावणीवेळी शेळके मळा परिसरातील नागरिकांनी आपले म्हणणे मांडले. तसेच या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनीही लोकवस्ती व कुटुंबे वास्तव्यास असल्याने याठिकाणी टाकण्यात आलेले आरक्षण वगळणेबाबत महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे आपला अहवाल पाठवावा, असे पत्रही दिलेले आहे.

इचलकरंजी शहरातील गावभागातील रि.स.नं.427/पै/2 या शेळके मळा पसिरातील मिळकतीमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कुटुंबे राहण्यास आहेत. हा संपूर्ण भाग पंचगंगा नदी लगतचा परिसर आहे. याठिकाणी दरवर्षी पंचगंगा नदीच्या महापूराचे पाणी येते व हे पाणी जवळपास तीन ते चार साचून राहते.

 

सन 2005, 2019 व 2021 मध्ये आलेल्या महापूरानंतर हा परिसर रेड झोनमध्ये समाविष्ट झालेला आहे. हा परिसर नवीन प्रारुप विकास आराखड्यात भाजी मार्केटसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. मूळात या परिसरात अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावरच महानगरपालिकेचे अहिल्याबाई होळकर भाजी मार्केट 50 वर्षांहून अधिक काळापासून आहे. त्यामुळे रि.स.नं. 427 मध्ये नियोजित भाजी मार्केटसाठी टाकलेले आरक्षण पूर्णतः चुकीचे आहे.

 

हा प्रारूप विकास आराखडा मंजूर झाल्यास याठिकाणी वास्तव्यास असणारी सर्व कुटुंबे रस्त्यावर येतील, असे निवेदनात म्हटले आहे.

तर यापूर्वी सन 1985, 1991 आणि 2001 मध्ये या भागातील जमिनीवर टाकलेल्या आरक्षणासाठी भूसंपादन केलेल्या व अद्याप ताब्यात न घेतलेल्या जमिनीचे दर निश्‍चित केले असताना या जागांचे पैसे महानगरपालिकेने आजतागायत दिलेले नाहीत. मूळात महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना लोकवस्तीचा भाग असलेल्या ठिकाणी आरक्षण टाकण्याचा अट्टाहास का केला जात आहे. शिवाय हा परिसर रेड झोनमध्ये असल्याने याठिकाणी टाकलेले आरक्षण वायाच जाणार असल्याने हे आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्यासह नागरिकांनी केली. यावेळी अ‍ॅड. श्रध्दा आरेकर, अ‍ॅड. व्हसवाडे, विनायक आरेकर, कस्तुरी पाटील, मोहन शेळके, सलीम कलावंत, रितेश शेळके, अभिनंदन शेळके, सिध्दाप्पा पाटील, बाळू गरड, मोहन शेळके, विवेकानंद आरेकर यांच्यासह शेळके परिसरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -