आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदा मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर मात्र, त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने छत्तीसगड, उत्तर विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता काल (शुक्रवारी) वाढली. त्यामुळे 7 ते 9 सप्टेंबरदरम्यान कोकणासह पुणे, सातारा घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने निवृत्त हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला हवामान विभागाने 7 ते 9 सप्टेंबर या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात कमी आधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच आहेत.