बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 6 गडी बाद करून विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
टीम इंडियासाठी सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.
टीम इंडियासाठी 73 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 10 वेळा सामनावीर, विराट कोहलीने 114 सामन्यात 10 वेळा सामनावीर, तर अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 10 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
आर अश्विनने 101 व्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दहावी वेळ होती. तसेच टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सहावा खेळाडू ठरला आहे.
कानपूर कसोटीत आणखी एक सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर राहुल द्रविडसह चंद्रपॉल, बॉर्डर, शेन पोलॉक, केएस विल्यमसन, इम्रान खान यांची बरोबरी करेल. भारताकडून कसोटीत सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाले आहेत. त्याच्या नावावर 14 पुरस्कार आहेत.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. 166 कसोटी सामन्यांसह कॅलिसने 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. कसोटीमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो एकमे,व खेळाडू आहे.