आगामी विधानसभा निवडणुकीच्या(political) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होताच शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील(political) बंडखोरीनंतर नाहटा यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते नाहटा यांनी 2014 मध्ये शिवसेना एकत्र असताना बेलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मंदा म्हात्रे, गणेश नाईक यांच्या सोबत झालेल्या तिरंगी लढतीत नाहटा यांना चार हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, यंदाही नाहटा महायुतीकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी जोरदार तयारी सुरू केली. रोज विविध कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे बेलापूर पट्ट्यात नाहटा यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे, मात्र सोमवारी (ता. 7) दिल्लीत झालेल्या वरिष्ठांच्या बैठकीत नवी मुंबईच्या एरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा भाजपला सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नाहटा यांना बेलापूरची जागा मिळेल, अशी आशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती. मात्र आता ही जागा भाजपच्या खात्यात जाणार असल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असून मोठा राजकीय स्फोट होण्याची चिन्हे आहेत.
नाहटा यांच्या समर्थकांनी शहरात बॅनर लावून नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी नाहटा यांच्या नाराजीचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नाहटा यांच्यासह शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसांत नाहटा याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
पवार गटानेही नाहटा यांना हिरवा कंदील दिल्याचे समजले जाते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाहाटा यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना नाहटा यांनी सांगितले की, 2019 मध्येही महायुतीमध्ये काम करताना मित्र पक्षाच्या उमेदवाराला जागा दिली होती. तेव्हा आम्हाला शांत बसावे लागले, मात्र आता शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मला निवडून आणण्याची शपथ घेतली. त्यामुळे मी लोकांच्या मनातील आमदार आहे, असं ते म्हणाले.
बेलापूर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उमेदवारीचे आव्हान आहे. नाईक आणि म्हात्रे यांच्यात उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच, नाहटा यांच्या भूमिकेमुळे येथील निवडणूक चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.