राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरशी संबधित आहेत. वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी वक्तव्यही केल्याने चर्चेत होते. पण आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मुश्रीफांनी का सोडलं पालकमंत्री पद ?
सहावेळा आमदार राहिलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे फक्त तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री असलेले मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आलं तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास 600 किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं . या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर येत आहे.
कोणाकडे सोपवली जाणारा वाशिमच्या पालकमंत्री पदाची धुरा ?
महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही थांबलेला नाही. मात्र तेव्हाच एक वेगळी बातमी समोर आली आहे ती हसन मुश्रीफांच्या निर्णयामुळे. वैद्यकीय शिक्षणमंत्री असलेल्या मुश्रीफ यांना वाशिमचं पालकमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. पण ते पद सोडण्याची इच्छा त्यांनी दर्शवली असून त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी चर्चासुद्धा केली असल्याचे समजते.
त्यातच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री असलेले दत्ता मामा भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाहीये, त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पदाची धुरा दत्ता मामा भरणे यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.