महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं 6000 रुपये दिले जातात.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 5 हप्त्यांमध्ये 10000 रुपये दिले आहेत. राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. एकीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आले आहेत. तर, महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये महिलांना 7 मार्च पर्यंत दिले जाणार आहेत. मात्र, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये कधी मिळणार याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून राबवली जाते. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून ही योजना सुरु आहे. या योजनेची सुरुवात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 5 हप्त्याची रक्कम मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवण्यात आले होते. तर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पाचव्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ किती जणांना मिळतो?
महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून यापूर्वी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 91.45 लाख शेतकऱ्यांना रुपये पाठवले होते. महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत या योजनेसाठी 9000 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता नमो शेतकरी महासन्मानचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
पीएम किसानच्या 19 हप्त्याचे 2000 जमा
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38000 रुपये मिळाले आहेत. 24 फेब्रुवारीला 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19 वा हप्ता देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी-मार्चच्या हप्त्याची रक्कम 7 मार्चपर्यंत जमा करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा आहे.