दोन चिमुकल्या मुलासह आईने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातल्या वांगी गावातील शेतात घडल्याचं समोर आली आहे. चित्रा दत्तात्रय हाके असे मृत मातेचे नाव असून स्वराज आणि पृथ्वीराज असे मृत चिमुकल्यांची नावं आहेत. पृथ्वीराज हा पाच वर्षाचा होता तर स्वराज हा अवघ्या दोन वर्षाचा होता.
नेमकं काय घडलं?
बुधवारी दुपारी चित्रा हाके ह्या घरातून आपल्या दोन्ही मुलासह निघाल्या. मात्र बराच वेळ त्या घरी परतल्या नसल्याने संध्याकाळी घरच्या लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतात असलेल्या विहिरीत उडी घेत त्यांनी आपली आणि मुलांची जीवनयात्रा संपवल्याचे दिसून आले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार त्यांचा एक मुलगा गतिमंद होता तर दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाही. सोलापूर अग्निशमन दलाच्या जवानानी मृत चित्रा हाके आणि स्वराज हाके यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत पृथ्वीराज याचे शव पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
नाशिकमध्ये प्रेमसंबंधांच्या विरोधामुळे महिलेची प्रियकरासह आत्महत्या-
प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर श्री.शनिदेव मंदिराजवळ घडली.या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार ‘ आत्महत्या करा ‘ अन्यथा ठार मारू अशी धमकी दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.