रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या कुडगाव येथील एका बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुण महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोगस डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिची प्रकृती गंभीर झाली आहे.
प्रकरणी संबधित बोगस डॉक्टर शंकर कुंभार याच्याविरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिघी सागली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
आपल्याला योग्य उपचार मिळावा म्हणून एक महिला गर्भधारणा संपवण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील खासगी दवाखान्यात गेली होती. बोगस डॉक्टर शंकर कुंभार याने कोणतीही वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफी न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. डॉक्टरने दिलेल्या या गोळ्यांचा परिणाम उलटा झाला आणि त्या महिलेला प्रचंड रक्तस्त्रावाला सामोरे जावं लागलं. काही वेळाने तिची प्रकृती खालावत गेली, तेव्हा नातेवाइकांनी तिला तातडीने तालुका उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.
गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्याने महिलेला हा त्रास झाल्याचं पुढील तपासात उघड झालं आहे. मात्र, या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये बोगस डॉक्टरवर फसवणूक आणि जीवाला धोका निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.