अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावर चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील रॉयल हॉटेलजवळ एका ट्रक चालकाने दोन वाहनांना धडक दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात एका वाहनातील महिलेचा मृत्यू झाला.
तर चार जण जखमी झाल्याची नोंद अक्कलकोट शहर उत्तर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात अमोल गुलदगड यांनी फिर्याद दिली. ते कार गाडी एमएच 12 डब्ल्यू यु 1230 मधून व अभिजित रासकर हे कार गाडी एम एच 12 बीई 8681 मधून अक्कलकोट येथील स्वामींचे दर्शन घेऊन शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तुळजापूरला दर्शनासाठी जात होते. चपळगाव येथे अक्कलकोटच्या दिशेने भरधाव वेगाने एक ट्रक क्रमांक एम एस 13 सीयू 5128 हा चुकीच्या दिशेने समोरून आला. समोर असलेल्या कारगाडीला बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर पाठीमागे असलेल्या कार गाडीलाही जोरदार धडक दिली. त्यात फिर्यादीची बहीण चारुशीला रासकर (वय 36) जागीच ठार झाली. जखमी
अमोल विजय रासकर (वय 36), प्रथमेश अमोल रासकर (वय 10, दोघे रा. मांजरी, जि. पुणे), चंद्रमा अभिजीत रासकर (वय 34, रा. हांडेवाडी, जि. पुणे), छाया विठ्ठल गुलदगड (वय 65, रा. पळशी, पो. लोणी भापकर, ता. बारामती) या सर्वांना कुंभारीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या सर्वांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याने ट्रकचालक ऋषिकेश दत्तात्रय पुरी (रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या विरोधात शहर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.