भारतीय लष्कराने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर ६ मे रोजी मध्यरात्री राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानातील ९ दहशतवाद्यांची केंद्र नष्ट करण्यात आली. या ऑपरेशनची माहिती सर्व पक्षांना देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशनची माहिती देताना महत्वाचे वक्तव्य केले. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. ते सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास अडीच तास ही बैठक सुरु होती. विरोधकांनी आपण सरकार सोबत असल्याचे बैठकीत सांगितले.
बैठकीत सरकारने काय सांगितले?
बैठकीत सरकारने सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास 100 दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहे. परंतु त्यासंदर्भात अजून ठोस माहिती मिळाली नाही. आम्ही यापुढे पाकिस्तानसोबत तणाव वाढवू इच्छीत नाही. परंतु पाकिस्ताने कोणतेही पाऊल उचलले तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांकडून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विशेष अधिवेशन बोलवावे, असे बैठकीत सांगितले.
बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. या दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ‘ऑन गोइंग ऑपरेशन’ आहे. भारतीय संरक्षण दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांनी आपले विचार मांडले. तसेच देशात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही सर्व एक असल्याचा संदेश देत असल्याचे किरेन रिजिजू यांनी सांगितले.
बैठकीत बोलताना एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय लष्काराचे अभिनंदन. पाकिस्तानमधील टीआरएफ विरोधात जगभरात मोहीम सुरु करण्यात यावी. भारताने या दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यासाठी अमेरिकेकडे पाठपुरावा केला पाहिजे. तसेच एफएटीएफमध्ये पाकिस्तानचा समावेश ग्रे-लिस्टमध्ये केला पाहिजे.
बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यात गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे देखील बैठकीला उपस्थित होते.