Thursday, June 26, 2025
Homeब्रेकिंगबैलगाडी शर्यतीतील दोन बैलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू'; झेंडा पडला, बैलगाडी सुसाट...

बैलगाडी शर्यतीतील दोन बैलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू’; झेंडा पडला, बैलगाडी सुसाट अन् ताबा सुटला..

गव्हाण (ता. तासगाव) येथे श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेत आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीतील बैलगाडीचा ताबा सुटून दोन बैलांसह बैलगाडी तलावात जाऊन कासऱ्याचा फास लागल्याने दोन्ही बैलांचा दुर्दैवी अंत झाला.

 

बैलगाडी शर्यतीचे सर्व नियम पायदळी तुडवत घेण्यात आलेल्या शर्यतीमध्ये दोन मुक्या जीवांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

गव्हाण येथे यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. आज आदत प्रकारातील बैलगाडी शर्यत सुटल्यानंतर मणेराजुरी हद्दीतील तलावापासून बैलगाड्या परत फिरणार होत्या. मात्र शर्यतीत सहभागी बैलगाड्यांपैकी एका बैलगाडीवरील चालकाचा ताबा सुटून बैलगाडी परत न फिरता थेट तीस-चाळीस फूट तलावाच्या पाण्यात गेली, बैलगाडी बाहेर काढण्याच्या नादात गळ्याला फास बसून पाण्यात बुडून दोन्ही बैलांचा दुर्दैवी अंत झाला. दोन्ही बैलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. संतोष पांढरे आणि संतोष गलांडे (अंकले, ता. जत) यांची बैलगाडी होती, असे समजते. प्रशासनाकडून शर्यतीवर देखरेखीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. मात्र उशिरापर्यंत महसूल प्रशासनाकडे अथवा पोलिसांकडे याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. बैलगाडी शर्यतीसाठी शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. अचानक हा प्रकार घडल्याने आणि त्यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. बैलगाडी शर्यत शौकिनांमध्ये शर्यतीचे बैल हा जिव्हाळ्याचा विषय असतो. अशा दोन बैलांचा मृत्यू झाल्याने सारे सुन्न झाले होते.

 

शर्यती सुरू असताना बैलांचा मृत्यू झाल्याने यात्रा आणि शर्यत संयोजन समितीची एकच धावपळ उडाली. ही बैलगाडी शर्यत नियमित अंतरापेक्षा जादा अंतराची आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने नेमलेले अधिकारी वादात सापडले आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि सुरक्षेचे नियम न पाळले गेल्याने मुक्या प्राण्यांचा हकनाक बळी गेल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -