पोलिस ठाण्याकडे पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या अंमलदारांना बदलीची प्रतीक्षा होती. मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना पोलिस अधीक्षकांच्या बदलीमुळे याला जून महिना उजाडला.
३१ मे रोजी रात्री झालेल्या आदेशानुसार सात श्रेणी फौजदार, ३२ सहायक फौजदारांसह ३४५ जणांची बदली करण्यात आली. तर ५९ जणांना मुदतवाढ देण्यात आली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशाने बदल्या करण्यात आल्या.
प्रशासकीय कालावधी पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांच्या बदल्यांची प्रक्रिया महिन्याभरापासून सुरूच होती. मार्च महिन्यापासून बदलीसाठीचे अर्ज मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ४०४ जणांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ५२ जणांना सहा महिने ते एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. तर आठ श्रेणी फौजदार, ३२ सहायक फौजदार, ८५ हवालदार, १९ नाईक, १८७ पोलिस शिपाई यांची बदली करण्यात आली. मोटार वाहन विभागातील १५ जणांचा बदलीमध्ये समावेश आहे.
‘त्या’ अंमलदारांना तातडीने कार्यमुक्त करा …
ज्या पोलिस अंमलदाराची बदली झाले आहे, त्यांच्याकडील प्रलंबित गुन्हे, अर्ज, इतर केस डायरी प्रभारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावेत. एक जूनपासूनच अशा अंमलदारांना कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी पाठवावे. बदलीच्या ठिकाणी २४ तासांत हजर झाल्याचा अहवाल कार्यालयाकडे पाठविण्याचा आदेश पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी जारी केला आहे.