गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यामुळे अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काय सुरु आहे.
५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
अहमदाबाद विमान अपघातात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात मृतांचा आकडा वाढू शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रुग्णालयाबाहेर गर्दी
या अपघातात अनेकजण जखमी झाले असल्याने त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर गर्दी जमली आहे. घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.या अपघातानंतर, अहमदाबाद विमानतळाची धावपट्टी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे आणि इतर सर्व उड्डाणे वळवण्यात येत आहेत.
इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रहिवासी भागात कोसळलं विमान
लंडनला जाणारे विमान ज्या ठिकाणी हे कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जात आहे.