राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तास कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत 2 जुलै रोजीही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
बुधवारी 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने सह्याद्रीच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सर्व घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्याव्यतिरिक्त पावसाचा जोर सध्या कमी आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. मात्र, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, सोबतच विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या पाचही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभालाच राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने उग्र रूप धारण केले आहे. कोकण, घाटमाथा तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.