सध्या टेक्नॉलॉजीचं युग असून रोज नवनवे शोध लागत आहेत. त्याप्रमाणेच विज्ञानही खूप पुढारलेलं असून त्यामुळे दीर्घ, खूप जुनाट आणि अतिशय गंभीर अशा आजांरावरही मात करता येते, रुग्णांना जीवनदान मिळते. विज्ञानाच्या याच आगळ्यावेगळ्या किमयेची झलक नागपूरमध्ये दिसली आहे. कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या एका तरूणावर नागपूरमध्ये खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तब्बल साडेनऊ तास खपून डॉक्टरांनी यशस्वी सर्जरी करत एकाच टप्प्यात प्लस्टिक सर्जरीद्वारे बनविलेले नवीन लिंग यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आलं. अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात झाली. मध्य भारतामध्ये अशा रितीने झालेली ही पहिलीच यशस्वी सर्जरी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा इसम (वय 40) मूळचा राजस्थानचा असून त्याला कॅन्सरमुळे 8 वर्षांपूर्वी त्याचे लिंग गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला अनेक व्याधींचा, समस्यांचा सामना करावा लागत होता. अखेर नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णलयात डॉक्टरांनी केलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला दिलासा मिळाला आहे.
नागपूरमधील डॉक्टरांना, प्लास्टिक सर्जन असलेल्या एका गटाला त्याच्या समस्येची माहिती मिळाली. त्यानंतर त्या इसमाने राजस्थानहून नागपूर गाठलं. नागपूरातील हॉस्पिटलमध्ये तब्बल साडेनऊ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यादरम्यान हाताच्या वरच्या बाजूच्या मांसपेशींचा वापर करून नवे लिंग तयार करण्यात आले आणि प्रत्यारोपित करण्यात आले. डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ. अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या तज्ज्ञांनी त्या इसमावर ही शस्त्रक्रिया केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पर्ण झाली. यावेळी डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन हे बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून काम पाहिले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
कशी झाली शस्त्रक्रिया ?
लिंगाच्या रचनेसाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्गाची (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली. नंतर जांघेच्या भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये संपूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे अशा अनेक बाबींचा या शस्त्रक्रियेत समावेश होता. अशा शस्त्रक्रियांना वैद्यकीय भाषेत ‘मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया’ असे म्हटले जाते. दरम्यान या सर्जरीनंतर त्या रुग्णाला मोठा दिलासा मिळाला असून आता तो पूर्णपणे बरा आहे.