Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रशेकडो शिक्षकांच्या पुन्हा होणार बदल्या

शेकडो शिक्षकांच्या पुन्हा होणार बदल्या

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे. ठाणे जिल्हा परिषदेतील संवर्ग-एक मधील 253 शिक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

या प्रक्रियेत अनेक शाळांवर संच मान्यतानुसार मंजूर शिक्षक पदांपेक्षा अधिक शिक्षकांना बदली दिल्याची बाब समोर आली आहे. अशाच पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली गेल्यास पुढे संवर्ग- दोन, तीन व चारच्या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यात बदलीस पात्र नसलेले शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील. परिणामी दीड-दोन महिन्यातच अतिरिक्त शिक्षकांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार असल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट खासगी सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहे. या कंपनीने शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळांमध्ये मंजूर पदसंख्या विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात अनेक शाळांत मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक बदली प्रक्रियेने पाठवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

18 जून 2024 च्या शासन निर्णय नुसार बदली प्रक्रियेसाठी सात टप्पे निश्चित करण्यात आले असून शिक्षकांची संवर्ग एक ते संवर्ग चार मध्ये विभागणी केली आहे. गुरुवारी संवर्ग एकच्या बदलीने ठाणे जिल्ह्यात अनेक शाळांवरील कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरले असून अशाच पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली गेल्यास अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांची संख्या शेकडोमध्ये जाण्याची भीती शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. सुरू असलेला जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑगस्ट, सप्टेंबर महिना उजाडणार आहे.

 

चुकीच्या प्रक्रियेने आमची ससेहोलपट…

 

संवर्ग- एकमध्ये अनेक दुर्धर आजारी, दिव्यांग, 53 वर्षावरील शिक्षकांचा समावेश होतो. शासन निर्णयाने या संवर्गातील शिक्षकांना सोयीची शाळा निवडण्याचा किंवा बदलीस नकार देण्याचा अधिकार दिला आहे. परंतु हे शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासन निर्णयाने अधिकार दिला परंतु चुकीच्या प्रक्रियेमुळे आमची ससेहोलपट होणार असल्याची भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -