तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याची सूचना उच्च न्यायालयाकडून करण्यात आल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. उच्च न्यायालयाकडून गुजरातमधील वनतारामध्ये हत्तीणीला पाठवण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर नांदणीवासियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, हत्तीणीला नेण्यासाठी गुजरात येथील वनताराचे पथक आल्याचे समजताच 25 जुलैला मध्यरात्री हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि या निर्णयाला विरोध केला. यानंतर 25 जुलै रोजी मूक मोर्चा काढून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. कोणत्याही स्थितीमध्ये महादेवी हत्तीणीला गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका नांदणीकरांनी घेतली आहे. या संदर्भामध्येच उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मठाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (28 जुलै) निर्णय होणार असल्याने समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे कोणता निर्णय येतो याकडे लक्ष असेल.
प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल
गेल्या बाराशे वर्षाची परंपरा महादेवी मठाला आहे. त्यामुळे या नांदणी मठाचा हत्ती का हवा आहे? असा सवाल समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. या पार्श्वभूमीवर हत्तीला नेण्यासाठी पथक येणार असल्याचे समजताच हजारो नागरिक जमा झाले होते. आम्ही कोणत्याही स्थितीत नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
काय आहे वनतारा?
दरम्यान, Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापित Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. 3,500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3,300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा घर आहे, ज्यामध्ये व्याघ्र, मगर, अजगर, न्यूमथुन आणि हत्तीही समाविष्ट आहेत. 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी केले, तेथे त्यांनी MRI, CT‑scan, हायड्रोगीक मसाज, हात्त्यांसाठी हायड्रोथेरपी अशा आधुनिक सुविधा निरीक्षण केले आणि हात्ती, चिंपांझी, काराकल व इतर दुर्लभ प्रजातींसह संवाद साधला होता.