बैलजोडी वाचविण्याच्या प्रयत्नात एका युवा शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. पांढरकवडा तालुक्यातील आसोली गावात सोमवारी ही घटना घडली. अमित बंडू पवार (वय २३) असे मृताचे नाव आहे.
अमित पवार हा त्याच्या शेतात फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी बैलबंडीने लगत असलेल्या तलावावर गेला होता. बैलबंडी तलावाच्या काठावर उभी केल्यानंतर अचानक बैल भूजले व बैल थेट तलावाच्या पाण्यात गेले. दरम्यान, बैल बुडू नये म्हणून अमित तत्काळ तलावात उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
अमित बराच वेळ दिसत नसल्याने आणि बैलबंडी तलावात असल्याने ग्रामस्थांना शंका आली. त्यामुळे त्यांनी शोधमोहीम सुरू केली. घटनेची माहिती त्वरित गावचे पोलिस पाटील देवीदास तोडसाम यांना देण्यात आली. ही घटना घाटंजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तेथील जमादार मेश्राम व शिपाई लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. काही वेळानंतर मोहदा व रुंझा येथील युवकांच्या मदतीने अमितचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने संपूर्ण आसोली गाव शोकसागरात बुडाले आहे. अमितच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तो आईसोबत राहत होता आणि तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.