पाऊस कायम राहिल्याने कृष्णा, पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. कुरुंदवाड-शिरढोण या महत्त्वाच्या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तसेच, इचलकरंजीशी जोडणारा हेरवाड-अब्दुललाट मार्गही पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनधारकांना पर्यायी लाटवाडी मार्गे प्रवास करावा लागत आहे.
धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून तब्बल 95 हजार 300 क्युसेक, तर वारणा धरणातून 39 हजार 666 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. याशिवाय, राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक राज्यात 1 लाख 16 हजार क्युसेक आणि राजाराम बंधाऱ्यातून 56 हजार 57 क्युसेक विसर्ग सुरु आहे. या पाणलोट क्षेत्रामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फूटांवर तर पंचगंगा नदीची पातळी यादव पुलाजवळ 50 फूटांवर पोहोचली आहे.
नदीकाठच्या गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी
आज पहाटे कुरुंदवाड-शिरढोण पूल पाण्याखाली गेला. पंचगंगेचे पाणी हेरवाड रस्त्यावर सुतार ओढ्यात आले आहे. ग्रामीण भागात नदीकाठच्या शेतजमिनीमध्ये पाणी शिरू लागल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
या पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. मदत आणि बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, नदीकाठच्या गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.