अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवून भारताची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. टॅरिफ लादून भारताच्या निर्यातीवर थेट हल्ला केला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होताना दिसत आहे. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शांघाई समिटमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केलं आहे. त्यांची सोशल मिडिया पोस्ट यामुळे चर्चेत आली आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट केली आहे. तसेच भारतासोबतचं व्यावसायिक नातं कसं आहे यावर प्रकाश टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते भारत अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणात सामान विकतो, पण अमेरिका भारताला खूप प्रमाणात सामान विकते. हे अनेक दशकांपासून सुरु असल्याचं ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत सांगितलं की, ‘खूप कमी लोकांना माहिती आहे की, आम्ही खूपच कमी प्रमाणात भारतासोबत व्यापार करतो. पण ते आमच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात. आम्ही त्यांचे मोठे ग्राहक आहोत. पण आम्ही त्यांच्यासोबत कमी व्यापार करतो. गेल्या अनेक दशकांपासून असा एकतर्फी व्यापार आतापर्यंत सुरु आहे.’ दुसरीकडे, त्यांनी भारत आमच्यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादल्याचा आरोप केला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करणं कठीण झालं आहे.
भारत मोठ्या प्रमाणात तेल आणि सैन्य दल साहित्य रशियाकडून खरेदी करतो. अमेरिकेकडून हा व्यापार खूपच कमी होता. त्यांनी आमच्याकडे आयातीवरील कर कमीत कमी करण्याची ऑफर दिली आहे. पण त्याला आता उशीर झाला आहे. त्यांनी हे खरं तर खूप वर्षांआधी करायला हवं होतं. ‘, असंही त्यांनी शेवटी पोस्टमध्ये म्हंटलं आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लादला होता. पण रशियाकडून तेल आयात करत असल्याने यात वाढ करत ती 50 टक्क्यांवर नेलं आहे. हा कर 27 ऑगस्ट 2025 पासून लागू आहे. यामुळे भारताच्या कापड, रत्ने-दागिने आणि सीफूडवर क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.



