फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी आयटी अभियंत्यांची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली. याप्रकरणी 23 ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर आता सोमवारी (दि. 1) दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संचालकाला अटक केली आहे.
राहुल शिंदे (24) यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लायनोट सॉस कंपनीचे संचालक उपेश पाटील (37), रोहन अंबुलकरआणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या इतर मित्रांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले.
कोणतेही प्रकल्प न देता आरोपींनी वेगवेगळी कारणे देऊन त्यांना कामावरून काढून टाकले. अशा प्रकारे आरोपींनी आयटी फ्रेशर्सचा विश्वासघात करूनएकूण 27 लाख 3 हजार रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी मयुर मुकुंद वाघ (24, रा. काळेवाडी फाटा) यांच्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. उपेश रणजित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर वाघ आणि इतर तरुणांकडून आरोपींनी प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली एक ते अडीच लाख रुपये प्रत्येकी घेण्यात आले. त्यानंतर काम न देता तरुणांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या आयटी फ्रेशर्स तरुणांचा आकडा 400 पेक्षा अधिक असून त्याबाबत हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.