बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. पंजाब, दिल्ली आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडताना दिसतोय. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण उत्तर, महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मराठवाड्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काल मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस बघायला मिळाला.
रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात आज पाऊस होऊ शकतो. पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, रहियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मीर या भागात मोठया प्रमाणात पाऊस हा पडताना दिसत असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक धरण भरून वाहत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा तसेच औद्योगिक वसाहतींचा वर्षभराची चिंता मिटली आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांना गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आठ तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची तहान या धरणातून भागवले जाते. गिरणा धरणात 96% पेक्षा जास्त जलसाठा शिल्लक आहे.
धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. गिरणा नदीपात्रात गिरणा व मन्याड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गिरणा धरणातून 814 क्यूसेक्स व मन्याड धरणातून 417 क्यूसेक्सने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.