पानटपरी अन्यत्र हलवत असताना विजेचा जोराचा झटका लागून तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना पालम शहरातील लोहा रोड परिसरात रविवारी (दि.१४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
पानटपरी हलवण्याच्या प्रयत्नात बैलगाडीवरील लोखंडी दांडीचा स्पर्श विजेच्या तारेला झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थ नरहरी बावळे (वय ३५, रा. जवळा, तालुका पालम), २) शेख शफीक शेख मुसा (वय ३१ वर्षे, ३) शेख शौकत शेख मुसा (वय ४०, दोघेही रा.बालाजी नगर, पालम) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शेख शफीक शेख मुसा (वय 31, रा.बालाजी नगर, पालम) यांची पानटपरी लोहा रोड येथे होती. रविवारी त्यांनी ही पानटपरी बैलगाडीत ठेवून आपल्या घरी हलवण्यास सुरुवात केली होती. टपरी बालाजी नगरमधील घराजवळ उतरवण्याच्या वेळी टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी वर उचलली गेली व ती थेट विजेच्या तारेला लागली. या धक्क्याने घटनास्थळी उपस्थित सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना जोरदार विजेचा शॉक लागला. या घटनेत सिद्धार्थ नरहरी बावळे (वय 35, रा.जवळा, ता.पालम), शेख शफीक शेख मुसा (वय 31), व शेख शौकत शेख मुसा (वय 40, दोघेही रा.बालाजी नगर, पालम) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातात शेख फरहान शेख महेबूब (वय 16), अशोक शेखर शेख सोबत (वय 18), शेख असलम शेख गुड्डू (रा.आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे पालम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी या प्रकाराकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.