कोल्हापुरात नुकतेच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात विकासाच्या द़ृष्टीने नव्या संधींना चालना मिळत आहे. सर्किट बेंचमुळे जिल्ह्यातील वकील, पक्षकार व सामान्य नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चात बचत होणार आहे.
नवीन तीन इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने कोल्हापुरात जागेची पाहणी सुरू केली आहे. तर आयटी पार्कला सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली असून कोल्हापूर की शाहूवाडी हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
कोल्हापूरकरांची 40 वर्षांपासून मागणी असणार्या कोल्हापूर खंडपीठ चळवळीला अखेर यश आले. देशाचे सरन्यायाधिक भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर शैक्षणिकसह विविध क्षेत्रांत हालचाली सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर शहर व परिसरात तीन नामांकित इंटरनॅशनल स्कूलने नवीन कॅम्पस उभारण्यासाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा, जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक व आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे
दरम्यान, राज्य सरकारने कोल्हापूर तसेच शाहूवाडी येथे आयटी पार्क उभारणीसाठी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आयटी पार्कमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांना माहिती तंत्रज्ञानातील कौशल्यांचा विकास करण्याची मोठी संधी मिळणार आहे. शैक्षणिक संस्था, तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे व उद्योग यांच्यात सुसंवाद वाढल्याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व उद्योगाशी निगडित अनुभव मिळणार आहेत.
शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार
सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी सकारात्मक वातावरणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नव्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढेल, भविष्यातील पिढ्यांना दर्जेदार शिक्षणासह करिअर घडवण्याचे भक्कम व्यासपीठ मिळेल, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.