गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने (Maharashtra Rains) थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाड्यातील (Marathwada Rains) शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी घेतली जात आहे. शेतकरी (Farmer) संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून (Bank) आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी SBI बँकेने नोटीसा (Notice) पाठवलेल्या आहेत. अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचा मोठा भाग वाहून गेलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यातच बँकांकडून वसुली सुरूच असल्याचे दिसून येत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी धाराशिव मधील शेतकऱ्यांनी केली आहे.
आम्ही पैसे कुठून भरायचे? (Dharashiv News)
याबाबत शेतकरी म्हणाले की, बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. आमच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. शेतकरी मरायच्या अवस्थेत आहे. त्यातच बँकेच्या अशा नोटिसा येत आहेत. गावातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिलेले आहे. शेतकरी संकटात सापडलेला असताना बँका जर असा तगादा लावत असतील तर आम्ही पैसे कुठून भरायचे? आमची आता पैसे भरण्याची परिस्थिती राहिलेली नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : कैलास पाटील (Dharashiv News)
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले की, मागील काही दिवसांपासून विशेषतः धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे असेल तर कर्जमाफी शिवाय पर्याय नाही. शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करतोय. कर्जमाफी करणे लांबच राहिले पण बँकांमार्फत शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. सरकारने याबाबत लक्ष घालून या नोटीसा थांबवणे गरजेचे आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा धाराशिव जिल्ह्यावर दौऱ्यावर आले होते, तेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना नोटीसा दाखवल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी नोटीसा गोळ्या करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. आम्ही त्या नोटीसा गोळा करत आहोत. आम्ही या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने पाठवणार आहोत. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ओरबाडण्याचे काम सुरु आहे आणि शासन मात्र गप्प आहे. याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटीसा पाठवणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
