वूमन्स टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर 247 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पाकिस्तानला या विजयी धावांचा पाठलाग करताना धड 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने पाकिस्तानला 7 ओव्हरआधी 159 वर ऑलआऊट केलं. भारताने यासह पाकिस्तानचा 88 धावांनी धुव्वा उडवला. भारताचा पाकिस्तान विरुद्ध वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाचवा तर एकूण 12 वा विजय ठरला
पाकिस्तानसाठी वनडाऊन आलेल्या सिद्रा आमिन हीने सर्वाधिक धावा केल्या. सिद्रकाने 106 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 9 फोरसह 81 रन्स केल्या. तर नतालिया परवेझ हीने 33 धावांचं योगदान दिलं. या दोघींव्यतिरिक्त एकीलाही भारताने 20 पार पोहचून दिलं नाही.पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघी आल्या तशाच झिरोवर आऊट होऊन माघारी परतल्या. टीम इंडियाच्या तिघींनीच पाकिस्तानचं पॅकअप केलं. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर स्नेह राणा हीने दोघींना बाद केलं. तर भारताने 2 विकेट्स या रन आऊटच्या माध्यमातून मिळवल्या.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. भारताची आश्वासक सुरुवात झाली. भारताच्या पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या 7 पैकी एकालाही या मिळालेली चांगली सुरुवात मोठ्या खेळीत बदलता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाला 250 धावाही करताता आल्या नाहीत.
भारतीय फलंदाज अर्धशतक करण्यात अपयशी
टीम इंडियाच्या पहिल्या 7 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 19 धावा केल्या. या 7 पैकी हरमनप्रीतचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर फार वेळ टिकू शकले नाहीत
रिचा घोष हीचा फिनीशिंग टच
मात्र अखेरच्या क्षणी रिचा घोष हीने दणका दिलाच. भारतीय चाहत्यांना रिचामुळे डेथ ओव्हर्समध्ये अपेक्षित फटकेबाजी पाहायला मिळाली. रिचाने 20 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 35 रन्स केल्या. रिचाच्या खेळीमुळे भारताला 247 धावांपर्यंत पोहचता आलं. यात क्रांतीने 8 धावा जोडल्या. पाकिस्तानने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला रोखण्यात यश मिळवलं. पाकिस्तानसाठी एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. डायने बेग हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी तिला चांगली साथ देत भारताला 50 ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर ऑलआऊट केलं.
टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
दरम्यान टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात 30 सप्टेंबरला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातून केली होती. भारताने तेव्हा श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानला लोळवलं. भारताचा क्रिकेट खेळातील सलग चौथ्या रविवारी चौथा विजय ठरला. याआधी टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मेन्स पाकिस्तानला पराभूत केलं होतं.
