जर तुम्हाला कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात C-DAC मध्ये नोकरीची संधी आहे. C-DAC ने प्रोजेक्ट इंजिनिअर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल आणि त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत careers.cdac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
योग्यता आणि अनुभव
C-DACमधील या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह बी.ई/बी.टेक किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान/संगणक ॲप्लीकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित क्षेत्रात एम.ई./एम.टेक./पीएच.डी. असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवार प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना पदानुसार 3 ते 15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी, 0 ते 4 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि पगार
उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पदानुसार 30 ते 50 वर्षं आहे. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 4.49 लाख ते 22.9 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळेल.
निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क
सी-डॅक भरतीसाठी निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
असा करा अर्ज
सर्वप्रथम C-DAC च्या careers.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
लॉग इन केल्यानंतर, सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा.
तुमचा लेटेस्ट रंगीत फोटोग्राफ ( (400 KB पर्यंत) आणि रेझ्युमे (500 KB पर्यंत) अपलोड करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट काढून ठेवा. भविष्यातील संदर्भासाठी तो पेपर सुरक्षित ठेवा.

