मैत्री हे नाते सर्वात अतुट असते असे म्हटले जाते. आनंदाच्या काळात, कठीण काळात कधीही तुमचे मित्र तुमची साथ सोडत नाहीत. शाळा, कॉलेज आणि नंतर कामाच्या ठिकाणी वेगवेगळे मित्र मैत्रीणी होतात. पण तुमच्या जवळचे काही मोजकेच असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत हे नाते निभावतात. अशाच चार मित्रांची एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी गोहाना येथील जम्मू-कटरा महामार्गावर रोड रोलरशी कारची धडक होऊन चार मित्रांचा मृत्यू झाला. रोहतक जिल्ह्याच्या ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बलवान रंगा यांचा मुलगा सोमबीरसह चार मित्रांचे रविवारी एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आले. हे चारही तरुण रोहतक जिल्ह्यातील घिलौड गावातील रहिवासी होते आणि एकाच कुटुंबातील होते. रविवारी चारही मृतदेह गावात पोहोचताच गावकऱ्यांनी हंबरडा फोडला. येथे एकाच चितेवर चारही जणांचे अंतिम संस्कार करण्यात आले. दुसरीकडे, बरोदा पोलिस ठाण्याने या प्रकरणात कारवाई करत महामार्ग प्राधिकरण आणि रोड रोलर चालकाविरुद्ध FIR दाखल केली आहे.
माहितीनुसार, गोहानाच्या नागरी रुग्णालयात तीन आणि खानपूर महिला वैद्यकीय केंद्रात एका तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह रोहतकला नेले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बलवंत सिंह यांनी सांगितले की, हा अपघात रुखी टोलपासून सुमारे एक किलोमीटर आधी रेल्वे पुलाजवळ झाला, जिथे रस्त्याचे बांधकाम सुरू होते. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या मते, रस्त्यावर ठेवलेला रोलर कोणत्याही चेतावणी चिन्ह किंवा बॅरिकेडिंगशिवाय सोडला गेला होता.
कारमधून कामासाठी निघाले होते
असे सांगितले जाते की, सोमबीर, अंकित, लोकेश आणि दीपांक हे चारही तरुण इंटरलॉकिंग टाइल्स विकण्याच्या कामासाठी कारमधून निघाले होते. सोमबीर कार चालवत होता, तर बाकी तिघे मागे बसले होते. त्यांचे वडील बलवानही त्याच कामासाठी दुसऱ्या वाहनातून मागे येत होते. रुखी टोलजवळ रस्त्याचे बांधकाम सुरू होते आणि तिथे ना चेतावणी दिवे लावले होते ना सुरक्षा बॅरिकेड्स. अचानक समोर आलेल्या रोड रोलरशी कारची धडक झाली आणि चारही तरुणांचा जीव गेला.
रोलर चालकाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे अपघात
मृत सोमबीरचे वडील बलवान यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, हा अपघात महामार्ग प्राधिकरण आणि रोड रोलर चालकाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे झाला. रस्त्यावर कोणतेही चेतावणी चिन्ह किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती, ज्यामुळे हा मोठा अपघात घडला. बलवान यांनी आरोप केला की, जर बांधकाम स्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केले गेले असते, तर त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांचे प्राण वाचले असते. माहिती मिळताच भैसवान खुर्द चौकी प्रभारी आणि बरोदा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि FSL पथकाला बोलावून तपासणी केली. घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून पोलिसांनी बलवान यांच्या तक्रारीवर महामार्ग प्राधिकरण आणि रोलर चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम 285 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.