कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.27) यासंदर्भात अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, मतदारयाद्या तयार करण्याचे काम वेगात सुरू असून, निवडणुकीसाठीची सर्व प्राथमिक तयारी अंतिम टप्प्यात आहे.
महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना निश्चित झाली असून, यंदाच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. शहरात एकूण 20 प्रभागांमधून 81 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
या 81 जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11 जागा, त्यापैकी 6 महिला, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 21 जागा, त्यापैकी 11 महिला राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 50 टक्के महिला आरक्षणामुळे सभागृहात 41 महिला नगरसेविका असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीतील 6, ओबीसी प्रवर्गातील 11 आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 24 महिला जागा आरक्षित राहतील.






