सायबर गुन्हेगारांकडून आता फोन वळवून (कॉल फॉरवर्डिंगद्वारे) नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा देत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
फोन वळवून गंडा घालणे हा सायबर फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे. यात सायबर गुन्हेगार नागरिकांना विविध कारणांनी मोबाइलवरील फोन वळविण्यास सांगतात. नागरिकांनी तसे केल्यास त्यांच्या मोबाइलवर येणारे ओटीपी, बँक व्यवहार किंवा यूपीआय व्यवहारांशी संबंधित माहितीही फसवणूक करणाऱ्यांकडे वळविले जातात. त्याद्वारे गुन्हेगार बँक खात्यांतील रक्कम चोरतात किंवा वैयक्तिक माहिती मिळवतात. काही गुन्हेगार नागरिकांना केवायसी अद्ययावत, सिम कार्ड समस्या किंवा बँक पडताळणीसाठी एका विशिष्ट कोडवर डायल करण्यास सांगतात. हा कोड सामान्यत ‘२१’ किंवा ‘४०१’ने सुरू होतो आणि शेवटी मोबाइल नंबर दिला जातो, असे पोलिसांनी सांगितले.
फोन वळवून होणारे नुकसान
बँक, यूपीआय, क्रेडिट, डेबिट कार्ड व्यवहारांशी संबंधित ओटीपी थेट फसवणूक करणाऱ्यांकडे पोहोचतात. तुमच्या नंबरवर कोणी फोन केल्यास तो दुसऱ्या व्यक्तीकडे वळतो. मित्र, नातेवाईक किंवा व्यावसायिक संपर्कातून गुन्हेगार विश्वास मिळवून मोठी फसवणूक करू शकतात. बँक, नोकरी, व्यावसायिक फोन गुन्हेगारांकडे पोहोचू शकतात.
फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ करा
अनोळखी व्यक्ती सांगेल तो ‘यूएसएसडी’ कोड कधीही डायल करू नका. तुमच्या मोबाईलवर *#२१# डायल करून कॉल फॉरवर्डिंग सक्रिय आहे का हे तपासा. फोन वळविणे इनेबल्ड दिसल्यास त्वरित बंद करा. सर्व कॉल फॉरवर्डिंग थांबवण्यासाठी ##००२# हा कोड डायल करावा. मोबाइल कंपनीच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधा. बँकिंग व्यवहारांबाबत तत्काळ बँक शाखेशी संपर्क साधून खाते लॉक किंवा फ्रीझ करा.
कॉल फॉरवर्डिंगद्वारे फसवणूक झाल्यास तातडीने http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर अथवा १९३०, १९४५ या हेल्पलाइनवर संपर्क करावा. नागरिकांनी दक्ष राहावे, असे फोन व संदेशांपासून होणारी फसवणूक टाळावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.






