यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीना नावाच्या 32 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. रामकेश सोबत लिव्हईनमध्ये राहणाऱ्या अमृता चौहान नावाच्या 21 वर्षीय तरुणीनेच त्याला संपवल्याचे समोर आले आहे. अमृता चौहान ही फॉरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेत होती. त्यामुळे खून पचवण्यासाठी तिने तिच्या शिक्षणाचा वापर करत रामकेशचा खून नव्हे तर अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तिचे बिंग फुटले असून तिला तसेच तिच्या एक्स बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील गांधी विहारमधील एका फ्लॅटमध्ये यूपीएससीची तयारी करत असलेल्या 32 वर्षीय रामकेश मीना या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. 5 ऑक्टोबरच्या रात्री अमृता चौहानने तिच्या एक्स बॉयफ्रेंड तसेच आणखी एकाच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले. या तिघांनी मीना याचा मोबाईल चर्जरच्या वायरने गळा दाबला. त्यानंतर अमृताने आपल्या फॉरेन्सिक शिक्षणाचा उपयोग करत मीना याच्या अंगावर तूप, तेल, दारू ओतली. त्यानंतर मीना याच्या मृतदेहाजवळ गॅस सिलिंडर ठेवून घराला आग लावून दिली. दुसऱ्या दिवशी मीनाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मीनाचा मृत्यू हा आगीमुळे झाल्याचे बासवण्याचा प्रयत्न अमृता हिने केला.
नेमकं बिंग कसं फुटलं?
दरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी मीनाच्या नातेवाईकाने पोलिसात तक्रार दिली होती. दाखल तक्रार आणि काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपास चालू केला. पोलिसांनी इमारतीतील काही सीसीटीव्ही हस्तगत गेले. यामध्ये अमृता चौहान मीनाच्या फ्लॅटमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत घुसताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी अमृताला तर 21 ऑक्टोबर रोजी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक केली. त्यानंतर दोन दिवसांनी या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले.
नेमकी हत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार मीना आणि अमृता लिव्हइन पार्टनर होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते सोबत राहात होते. मात्र मृत रामकेश मीना याच्यासोबत तिचा वाद झाला होता. मीनाच्या फ्लॅटमधून एक हार्ड डिस्क मिळाली आहे. या हार्ड डिस्कमध्ये 15 तरुणींसोबतचे अश्लील व्हिडीओ आहेत. पोलिसांना संशय आहे की, मीना लपून मुलींसोबत अश्लील व्हिडीओ काढायचा. त्याने बऱ्याच मुलींसोबत असे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे अमृता चौहानचेही मीनाने तिच्या परवानगशिवाय काही अश्लील व्हिडीओ काढले होते. हे व्हिडीओ डिलीट करण्याची मागणी अमृता हिच्याकडून केली जात होती. मात्र मीना यास नकार देत होता. त्यामुळेच दोघांमध्ये वाद वाढला आणि यातूनच पुढे मीनाची हत्या करण्यात आली.
